पालगड (दापोली): शिरखळ पुलाजवळ आज सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

विकास नरहर काळे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पालगड येथील ब्राम्हणवाडी येथे राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास काळे हे त्यांच्या सुझुकी ऍक्सेस १२५ (MH-08AM-2892) या दुचाकीवरून पालगडहून मंडणगडकडे जात होते.

शिरखल पूल येथे मागून येणाऱ्या ट्रायम्फ स्क्रॅम्बलर (MH-12-XC-0330) दुचाकीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

या अपघातात विकास काळे रस्त्यावर गंभीर जखमी होऊन पडले.

विकास काळे यांचा भाचा विनय जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय सुनील जगताप (रा. पुणे) याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष न देता आपल्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालवून विकास काळे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

त्यामुळे विकास काळे यांच्या लहान मोठ्या दुखापतीस व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला.

स्थानिक लोकांनी त्यांना तातडीने करंदीकर हॉस्पिटल, पालगड येथे नेले.

तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे पाठवण्यात आले.

मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या अपघातात ट्रायम्फ स्क्रॅम्बलर चालवणारा तन्मय सुनील जगताप (रा. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. विनय जोशी यांनी तन्मय सुनील जगताप याच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दिली आहे.