आरटीपीसीआर नमूने तपासणीसाठी आणखी एक प्रयोगशाळा सुरु करावी-केदार साठे

दापोली  : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यास 4 ते 7  दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत मात्र त्यांचा अहवाल प्राप्त होत नसल्याने ते घरीच रहात आहेत या कोरोनाबाधित रुग्णांचा नातेवाइकांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव  होत असल्याचे आता दिसून येत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी आता आरटीपीसीआरचे नमुने तपासण्यासाठी आणखी एक प्रयोगशाळा सुरु करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे.

कोव्हिडचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठया प्रमाणात होत असून कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले रुग्णांचे नातेवाईक तसेच अन्य लोकांचे स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी रत्नागिरी येथे दररोज पाठविले जात आहेत.

मात्र या प्रयोगशाळेची क्षमता  दररोज सुमारे 1 हजार 200 नमुने तपासण्याची असून तपासणीसाठी येणार्‍या नमुन्यांची संख्या सुमारे 5 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अनेक नमुने तपासणीअभावी तसेच रहात असल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे अहवाल वेळेत येत नसल्याने तो येईपर्यंत रुग्णांच्या संपर्कात अनेकजण येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे चिपळूण सारख्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी  आरटीपीसीआरचे नमुने तपासणीसाठी एखादी शासकीय किंवा खाजगी लॅब उघडण्यासाठी तातडीने परवागनी द्यावी अशी मागणी केदार साठे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

सिंधुदुर्ग सारख्या लहान जिल्ह्यात दोन शासकीय तर एक खाजगी अशा तीन प्रयोगशाळा आहेत तर 9 तालुके असणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यात केवळ एकच शासकीय प्रयोगशाळा आहे. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आता 100 बेडचे कोरोना रुग्णालय सुरु झाले असून याच ठिकाणी प्रयोगशाळा सुरु केल्यास रत्नागिरी येथील शासकीय प्रयोगशाळेवर असलेला ताण कमी होईल. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*