रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र शासनाकडील सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशान्वये सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे खुली करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविक रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून सुध्दा मोठया प्रमाणात श्री देव गणपती यांच्या दर्शनासाठी येत असतात.

सद्यस्थितीत कोविड – 19 या साथीच्या रोगाची महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने तसेच श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेले भाविक दर्शना नंतर किंवा दर्शना आधी श्री क्षेत्र गणपतीपुळे लगत असलेल्या समुद्रामध्ये / समुद्र किनारी आंघोळ किंवा पोहण्यासाठी जातात व अशा वेळी समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे यापुर्वी अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

त्यामुळे कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढून जिवितहानी होऊ नये म्हणून व समुद्राच्या पाण्यात पोहण्यास गेले असता बुडुन मृत्यु होऊ नये म्हणून / जिवितहानी होऊ नये म्हणून जिल्ह्यातील नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना म्हणून

डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार, नागरीकांची जिवितहानी होऊ नये म्हणून श्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12.01 वाजले पासून ते 23 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत कोणत्याही भाविकास श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास या आदेशाव्दारे मनाई करण्यात येत आहे.