पश्चिम महाराष्ट्र आता कोकणाच्या आणखी जवळ येणार आहे. कारण, एका घाटमार्गाने कोल्हापूर आणि रत्नागिरीतील अंतर कमी केलं जातंय. हा रस्ता गगनबावडा, भुईबावडा आणि अणुस्कुरा घाटालाही पर्याय ठरणार आहे. या नव्या घाटाचं नाव आहे, काजिर्डा घाट. या नव्या रस्त्यामुळे अवघड वळणाचा घाट वाचणार आहे. नवा घाट एकदम सोपा आहे, वळणं नाहीत. त्यामुळे तब्बल तासाभराचा प्रवास आणि 20 ते 30 किमी प्रवास वाचणार आहे. रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये अतिदुर्गम परिसरात वसलेलं काजिर्डा गाव. कोल्हापूर जिल्हा यांना हाकेच्या अंतरावर. पण प्रशासनाच्या लालफितीने हाकेचं अंतर काही मैलाचं झालं. रस्ता व्हावा यासाठी 1977 पासून हे गावकरी धडपडत आहेत. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला हा आवाज कधी ऐकूच आला नाही. त्यामुळेच आता गावकऱ्यांनी एकजुटीची तलवार उपसली आणि घाटरस्ता करण्याचे प्रयत्न सुरु झाले. मनसेची शॅडोकॅबिनेट मदतीसाठी पुढं आली आहे. काजिर्डा गावातून हा रस्ता थेट जातो कोल्हापुरातल्या बाजार भोगावमध्ये. हे अंतर आहे केवळ 20 ते 25 किलोमीटरचं. हा रस्ता झाला तर कोल्हापुरातील तब्बल 60 गावं थेट रत्नागिरीला जोडले जातील. 1977 ला हा घाट फोडण्यात आला, पण रस्ता कुणी केला नाही. त्यामुळेच आता सरकारी निधीची वाट न पाहता, ग्रामस्थांनीच लोकवर्गणीतून निधी जमा केला. तर मनसेच्या शॅडोकॅबिनेटकडून रस्ता बनवण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी दिली जाणार आहेत. हा रस्ता झाला तर सर्वात कमी वेळात कोल्हापुरातून कोकण आणि कोकणातून कोल्हापूर गाठता येईल. शिवाय, शेतमालाची ने-आणही सोपी होईल. इतर घाटांपेक्षा हा घाट सोपा असल्याने दुर्घटनांचं प्रमाणही कमी होईल ,असं गावकरी सांगतात. त्यामुळं येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी हा घाट सुरु झाला, तर अनेक गावं विकासाच्या महामार्गावर येतील.