शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही, तर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी मांडली.शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची भाजपची मागणी त्यांनी फेटाळून लावली. केवळ राजकारणासाठी अशी मागणी केली जात असल्याची टीका त्यांनी केली
.राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता व संत साहित्यांचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुशार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र ही मागणी मान्य करता येणार नाही, असे वर्षां गायकवाड यांनी स्पष्ट केले.
भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. एका धर्माच्या ग्रंथाचा शिक्षणात समावेश केला तर, इतर धर्मीयांकडूनही तशी मागणी होईल. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष तत्वाचा समावेश आहे. विद्यार्थीदशेपासून मुलांच्या मनात हे विचार रुजविले पाहिजेत. त्याचबरोबर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे राजीव गांधी विज्ञान नगरी ( राजीव गांधी सायन्स सिटी) स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.