दापोली : दाभोळ गावामध्ये बंद पडलेले रेशन दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत सुरू झाले नाहीत तर 1 मे रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता जावकर यांनी दिला आहे. तहसीदारांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी तसा इशारा दिला आहे.

त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, दाभोळ मधील ३ रेशन दुकाने दिनांक २८/०४/२०२० पासून बंद आहेत. त्यामुळे दाभोळ गावातील नागरिकांना गेले वर्षभर कोरोना काळात रेशन आणण्यासाठी ७ ते ८ कि.मी. लांबीचा प्रवास करून रेशन आणावे लागत आहे. रेशन आणण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थालान दोन ते तीन वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत.

दि. १८/०७/२०२० रोजी दाभोळ गांवातील तीनही रेशनदुकानांच्या जाहिरनाम्याची प्रक्रिया तालुका पुरवठा विभागाकडून पूर्ण झाली आहे. याला ०८ महिने होऊन गेले आहेत. तरीदेखील याविषयी आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत आम्ही आपल्या कार्यालयात वारंवार विचारणा करून देखील आपल्याकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

तरी सदर प्रकरणी ग्रामस्थांना या कोरोना काळामध्ये प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे रेशनिंग गावात उपलब्ध करून मिळावे. या मागणीसाठी मी स्वतः माझ्या महिला कार्यकत्यांसोबत कोव्हिडचे नियम पाळून आपले कार्यालयासमोर दिनांक १ मे २०२१ या ‘महाराष्ट्र दिनी’ आमरण उपोषणास बसणार आहे.

तालुक्यातील प्रशासन या लक्ष देत नसल्यामुळे आता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संबंधित विभागाला कडक आदेश द्यावेत, अशी मागणी गावातून होत आहे.