आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील धारावीतून कोरोना संदर्भात मोठी दिलासादायक बाब समोर आली आहे. आज, रविवारी मुंबईतील धारावीत २४ तासांत एकही कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेने (BMC) माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेने सांगितले की, धारावीतील सध्या कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या २२ इतकी आहे. धारावीत कोरोनाची लढाई खूप महत्त्वाची आहे. एकेकाळी धारावीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य आहे, असे म्हटले जात होते. परंतु आता त्याच दाटीवाटीच्या वस्तीत एकही रुग्ण न आढळल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्यांदा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात १४ तारखेला धारावीमध्ये एकही कोरोनाबाधित आढळला नव्हता. तसेच ८ एप्रिलला सर्वाधिक ९९ रुग्ण आढळले होते.