रत्नागिरी:- शाळा, कॉलेज, रेस्टॉरंट, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे सुरू झाली म्हणजे कोरोना कुठेतरी पळून गेला, असे समजू नका. आपल्याकडे कोरोनाचा नवीन स्ट्रेन (प्रकार) अजून आला नसला तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचे दुरगामी परिणाम टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर बाळगणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे, तसेच 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज स्पष्ट केले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे व दिवसेंदिवस कोरोना विषाणूने बाधीत व्यक्तींच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी नव्याने आदेश निर्गमित केले आहेत.

यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत असणाऱ्या विविध क्रिडा स्पर्धा यामध्ये कबड्डी, क्रिकेट, खो-खो, इ. यांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी शिवाय भरविण्यास मनाई करण्यात येत आहे. स्थानिक प्राधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय आठवडे बाजार, जनाव बाजार, भरवता येणार नाहीत.