सहभागी होवून लाभ घ्यावा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आवाहन
रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार दिनांक २२ मार्च रोजी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनिल गोसावी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव माणिकराव सातव यांनी केले आहे.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदातलतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांबरोबरच वादपूर्व प्रकरणांमध्ये म्हणजे विद्युत कंपनी, बीएसएनएल, विविध बॅंका, पतसंस्था यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत यांचे विविध विभागाचे थकीत रकमेबाबतची प्रकरणे, पोलिस ठाण्यातील अदखलपात्र गुन्हे, वाहतूक विभाग यांनी वाहनावर केलेली दंडात्मक कारवाई, त्याच्या वसुलीची प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत.
या प्रकरणांमध्ये लोक न्यायालयात निवाडा झाल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे बॅंका, वाहतूक शाखा, नगरपरिषद, ग्रामपंचायत यांनी न्यायालयीन कामकाजासाठीचा खर्च वाचावा यासाठी लोक अदालतचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक पर्यायी वादनिवारणाचा विचार करत आहेत असे दिसून येते.
लोक अदालतमध्ये न्यायालयातील एकूण ३७१० प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली आहेत तसेच ३४४०८ वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत.
यामध्ये ग्रामपंचायतीकडील एकूण २२७७० एवढी घरपट्टी व पाणीपट्टी वादपूर्व प्रकरणांचा समावेश आहे.
सर्व संबंधित पक्षकारांसाठी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एक चांगली संधी चालून आली आहे. त्याचा लाभ घेउन परस्परातील वादांना पूर्णविराम देता येणार आहे.
सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवता येईल त्यासाठीच लोक न्यायालयाचा मार्ग निवडण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.