दापोली: मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली या शाळेने सर्वांगीण विकास हा निकष पूर्ण करीत आयएसओ ९००१:२०१५ हे प्रमाणपत्र मिळवले आहे. दापोली शहरातील पहिली व तालुक्यातील दुसरी आयएसओ मानांकन मिळवणारी शाळा ठरली आहे.
नॅशनल हायस्कूलची स्थापना 1940 साली मुनीर खान सर्गुरोह यांनी केली होती. संस्थेचे ज्युनिअर कॉलेज व महिला महाविद्यालय देखील कार्यरत आहे.
इयत्ता पाचवी पासून डिग्री कॉलेज पर्यंत विद्यार्थ्यांची एकूण संख्या 950 एवढी आहे. प्रशालेत शिकणाऱ्या बहुतेक मुलांचे पालक मध्यमवर्गीय आहेत. सामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अगोदर श्रमदान आणि मग उरलेल्या कामासाठी निधीसंकलन हे सूत्र ठरवून शाळेने वाटचाल सुरू केली.
त्यामुळे शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे. शाळेची सुशोभित स्वातंत्र्यपूर्व काळातील इमारत, सेमी इंग्रजी माध्यम, बोलक्या भिंती, ई लर्निंग सुविधा, वर्गामध्ये व्हाईट बोर्ड, पाणी पिण्यासाठी वॉटर प्युरिफायर, सुसज्य ग्रंथालय, अटल टीकरिंग लॅब, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक लॅब, प्रशस्त मैदान, शाळेसमोर विविध फुल फळांची झाडे, शालेय पोषण आहाराची प्रभावी अंमलबजावणी, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वस्तू व कपड्यांच्या स्वरूपात मदत अशा विविध वैशिष्ट्यांसह दर्जेदार शिक्षणामुळे पट संख्येचा आलेख दरवर्षी वाढतच आहे.
शिष्यवृत्तीसह अन्य शाळाबाह्य परीक्षा, विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व मिळालेली पारितोषिके यांमधून विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. मुख्याध्यापक आयुब मुल्ला यांच्या अथक प्रयत्नांमुळे शाळा व कॉलेजचा कायापालट झाला आहे. प्रशालेचे माजी विद्यार्थी व अनेक दानशूर यांच्या सहकार्यातून शाळेला विविध सुविधा या प्राप्त झाल्या आहेत.
निकषांची पूर्तता आहे हे पाहून आयएसओ कडून प्रशालेला लक्ष्मीकांत साधू यांच्या हस्ते प्रमाणपत्र हस्तांतर करण्यात आले. या हस्तांतर कार्यक्रमाच्या प्रसंगी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटीचे चेअरमन आरिफ मेमन ,नगराध्यक्ष खालीद रखांगे आदि मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात प्रशालेचे वार्षिक बक्षीस वितरणाचा व दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. आयएसओ संस्थेचे लक्ष्मिकांत साधू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांचे वाटप करण्यात आले.
शाळेची प्रगती ही अशाच प्रकारे होवो व गुणवत्ता ही टिकून राहो अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक सलमान मोमीन, फातिमा असलम नदाफ व आमतुल्ला डोंगरकर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार रियाज अहमद खान यांनी मानले.