शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून इशारा मिळाल्यानंतरही नाना पटोले स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम;

नाना पटोलेंच्या ‘स्वबळा’ची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी तसंच शिवसेनेकडून सूचनावजा इशारा मिळूनही ते आपल्या स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. स्वबळावर लढायचं हाच आमचा आणि पक्षाचा अजेंडा असल्याचं भाष्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला भविष्यात त्याचे परिणाम नक्की पाहायला मिळतील. आम्ही जी दिशा घेऊन काम करत आहोत, त्यावरुन महाराष्ट्रात काँग्रेस ही एक नंबरची पार्टी आहे हे तुम्हाला येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.”

स्वबळाच्या मुद्द्यावरुन पुनर्विचार करणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “नाही, हा निर्णय पक्षाच्या पातळीवर घेण्यात येईल. मी फक्त एवढंच सांगेन की, काल पवारांनी जे वक्तव्य केलं, तसाच निर्णय त्यांनी २०१४ मध्येही घेतला होता. तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय़ होता. आमच्या पक्षाचाही काय करायचं, कसं करायचं याबद्दलचा निर्णय होईल. ती आमच्या पक्षाची रणनीती असेल.

सत्तेमध्ये आणि आगामी निवडणुकांविषयीच्या विधानांमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच असतात, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी विचारणा केली असता नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली होती. “आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार”, असं नाना पटोले म्हणाले होते.

त्यांच्या या विधानावरुन मोठी खळबळ माजली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रियाही दिली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*