रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्थेमध्ये केंद्र शासनाच्या “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -२०१३” अंतर्गत स्थापन झालेल्या अंतर्गत तक्रार समितीमध्ये नमिता कीर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीचा मुख्य उद्देश महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. या नियुक्तीमुळे समितीचे कार्य अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नमिता कीर या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा असून, महाराष्ट्र विश्वकोष मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच, त्यांची रत्नागिरी जिल्हा भाषा समितीवरही सदस्य म्हणून निवड झाली आहे.
विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या समितीवर त्यांची ही दुसरी नियुक्ती आहे. यापूर्वीही त्यांनी अशा समितीवर यशस्वीपणे कार्य केले आहे.
या नियुक्तीमुळे राज्य मराठी विकास संस्थेमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक ठोस पावले उचलली जाणार असून, समितीच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी आशा आहे.