दापोली: मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांसाठीच्या दोन्ही चेंजिंग रूम पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत.
यामुळे येथे भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारा हा पर्यटकांचा आवडता ठिकाणांपैकी एक आहे. येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते.
पर्यटकांच्या सोयीसाठी येथे दोन स्वतंत्र चेंजिंग रूम बांधण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये शौचालय आणि कपडे बदलण्याची स्वतंत्र खोली उपलब्ध होती. पण सुरुवाती पासूनच त्याचा उपयोग काही झाला नाही. पहिल्या पावसातच या खोल्यांचं नुकसान झालं होतं.
आता या दोन्ही सुविधा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. परिणामी, पर्यटकांना मूलभूत सुविधांअभावी त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्त केला असून, लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या सुविधा समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात कोणावरही कारवाई झालेली नाही. ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कारवाई करावी.