रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे जीवघेणी ठरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, अनेक निष्पाप जीव या अपघातांमध्ये बळी पडले आहेत.
अर्धवट स्थितीत असलेली कामे आणि धोकादायक वळणे यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते वळणावळणाचे आहेत. अवघड वळणांवर होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे 20 वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 या 14 महिन्यांच्या कालावधीत 127 गंभीर अपघात जिल्ह्यात झाले असून, त्यातील सर्वाधिक अपघात मुंबई-गोवा महामार्गावर झाले आहेत.
या सर्व अपघातांमध्ये 137 जणांचा नाहक बळी गेला आहे. याच कालावधीत 119 छोटे अपघात झाले असून, त्यामध्ये 292 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये 210 पुरुषांसह 82 महिलांचा समावेश आहे.
किरकोळ 89 अपघातांमध्ये 264 जणांना दुखापत झाली आहे. त्यामध्ये 187 पुरुष तर 77 महिलांचा समावेश आहे. 64 अपघातांमध्ये केवळ वाहनांचे नुकसान झाले असून, चालक जखमी झालेले नाहीत.
चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर ते हातखंबापर्यंत अर्धवट अवस्थेत आहे. या भागात अपघातांची संख्या मोठी आहे.
अर्धवट कामे पूर्ण होणार तरी कधी ?
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुतांश कामे अर्धवट स्थितीत आहेत. ती पूर्ण कधी होणार याची प्रतीक्षा आहे. अर्धवट कामांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
याबाबत टीका झाल्यानंतर कामे पूर्ण करण्यासाठी अंतिम तारखा आजवर अनेकवेळा दिल्या गेल्या पण प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्याने अपघात आणि अपघातील मृत्यू आणि जखमींची संख्या वाढत आहे.
अपघातानंतर वाहनांच्या महामार्गावर लागणाऱ्या लांबच लांब रांगाही चिंता वाढविणाऱ्या ठरत आहेत.