इंधनदरवाढ व महागाईविरोधात नवी मुंबईत काँग्रेसची सायकल रॅली.

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना मोदी सरकार इंधन व गॅसच्या किंमती वाढवून गरिबांची लूट करत आहे. मुठभर बड्या लोकांच्या हितासाठी काम करणा-या मोदींच्या काळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहेत. गरिबांना लूटणा-या मोदी सरकार विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन तीव्र संघर्ष करेल, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी केली.
नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. या रॅलीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग व बंदरे मंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नसीम खान पुढे म्हणाले की, युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त असतानाही पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवून सामान्य माणसांना महागाईची झळ बसू नये याची खबरदारी घेतली होती. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलर असतानाही पेट्रोल १०६ रुपये लिटर तर डिझेल ९६ रुपये लिटर झाले आहे, एलपीजी सिलिंडर ८५० रुपये झाले आहे. सामान्य माणसांना सिलिंडर घेणेही कठीण झाले आहे. खाद्यतेल, डाळीच्या किमतीही भरमसाठ वाढलेल्या असून मोदी सरकार या महागाईतून सामान्य जनतेला दिलासा देत नाही. मोदी सरकार हे सुटबूटवाल्यांचे सरकार आहे. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या या अन्यायी महागाईविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे आणि यापुढेही संघर्ष करत राहू.