रत्नागिरी – चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी एका धक्कादायक प्रकरणात निर्णय देताना एका महिन्याच्या बालिकेच्या खुनासाठी तिच्या जन्मदात्या मातेस, शिल्पा प्रविण खापले, यास भा.द.वि. कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून आजन्म कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चिपळूण तालुक्यातील वहाळ, घडशीवाडी येथे राहणारी आरोपी शिल्पा प्रविण खापले ही तिच्या पती, दोन लहान मुली आणि सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. शिल्पाला दोन मुली असूनही मुलगा व्हावा, अशी तीव्र इच्छा होती. मात्र, दुसऱ्या प्रसूतीवेळीही मुलगीच झाल्याने ती अस्वस्थ होती. ५ मार्च २०२१ रोजी तिचे पती रत्नागिरीला गेले असताना दुपारी तिने आपल्या एक महिन्याच्या मुलीचे डोके पाण्याने भरलेल्या बादलीत खाली आणि पाय वर अशा अवस्थेत ठेवून तिचा खून केला. शेजारी जमले तेव्हा तिने बेशुद्ध पडल्याचे नाटक करत “मी नाही केले” असा बेबनाव केला.

प्रकरणाची सुरुवात सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली. मात्र, पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांनी सखोल तपास केला असता, मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे भा.द.वि. कलम ३०२ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान शिल्पाच यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील ॲड. अनुपमा ठाकुर यांनी १५ साक्षीदारांचे साक्षीपुरावे, वैद्यकीय अहवाल, पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षी आणि शेजाऱ्यांच्या जबाबासह सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा आधार घेत आरोपीचा गुन्हा सिद्ध केला. मुलाच्या हव्यासापोटी शिल्पाने आपल्या एक महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बादलीत बुडवून मारल्याचे सिद्ध झाले.

न्यायालयाने निकाल देताना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेचा आणि संविधानातील बालिकांच्या अधिकारांचा उल्लेख करत समाजातील मुलींवरील भेदभावावर भाष्य केले. आरोपी महिला असूनही तिने मुलाच्या लालसेपोटी स्वतःच्या मुलीचा खून केल्याने कठोर शिक्षेची आवश्यकता असल्याचे नमूद करत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला.

या खटल्यात सरकारी वकील ॲड. अनुपमा ठाकुर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, तर पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांनी सखोल तपास करून पुरावे गोळा केले. कोर्ट पैरवीसाठी पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.