कुंभार्ली घाटात भीषण अपघात: आई-मुलाचा मृत्यू

रत्नागिरी: चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री एका कारचा भीषण अपघात झाला.

सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला.

विश्वजित जगदीश खेडेकर (वय ४२) आणि सुरेखा जगदीश खेडेकर (६५, दोघेही रा. कुंभार्ली) अशी मृतांची नावे आहेत.

विश्वजित आणि सुरेखा खेडेकर हे दोघे पुण्याहून त्यांच्या कुंभार्ली गावी यात्रेसाठी येत होते.

पाटण येथे रविवारी रात्री ८.३० वाजता जेवण करून ते पुढील प्रवासासाठी निघाले.

रात्री १० च्या सुमारास कुंभार्ली घाटातील पोलिस चौकी ओलांडल्यानंतर तिसऱ्या वळणावर त्यांची कार सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळली.

या वेळी जवळपास कोणी नसल्याने हा अपघात कोणाच्याही लक्षात आला नाही.

विश्वजित आणि सुरेखा उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने त्यांचे पती जगदीश खेडेकर यांनी दोघांच्याही मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, संपर्क होऊ शकला नाही. अखेर जगदीश खेडेकर यांनी दोघांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.

ड्रोनच्या साहाय्याने कुंभार्ली घाटात शोध घेतला असता, एक कार दरीत आढळली.

ग्रामस्थांच्या मदतीने दरीत उतरून पाहणी केली असता, विश्वजित आणि सुरेखा यांचा मृतदेह आढळला.

भरत लब्धे यांच्यासह ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य करून मृतदेह बाहेर काढले.

या घटनेमुळे कुंभार्ली गावात शोककळा पसरली आहे. जगदीश खेडेकर यांच्या वडिलांचे ६ महिन्यांपूर्वीच निधन झाले होते, त्यानंतर आता पत्नी व मुलाच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

या अपघाताची नोंद अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

विश्वजित खेडेकर हे पुण्याच्या एका नामांकित कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*