रत्नागिरी : कलकत्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या पर्सोना डायव्हरसिटी फॅशन विक मिस इंडिया-२०२१ या स्पर्धेत चिपळूण येथील सानिया प्रशांत चव्हाण हिने मिस इंडिया ऑफ द विक हा किताबा पटकावला. इयत्ता नववीत शिकणाऱ्या सानियाच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या सौ. प्राची आणि प्रशांत चव्हाण यांची कन्या सानिया हिला लहानपणापासूनच ग्लॅमरचे वेड. अगदी लहान असल्यापासून ती टिव्हीवरील फॅशन शो बघून कॅट-वॉक करत असे. पुढे हेच वेड तिला मिस इंडिया य किताबापर्यंत घेऊन गेले. सिने कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत सानिया हीचे नाव मिस इंडिया ऑफ द विक म्हणून घोषीत झाले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात रत्नकन्येचे अभिनंदन केले.
अभिनेता तुषार कपूर यांच्या हस्ते सानिया हिला गौरविण्यात आले. सानिया हिला या स्पर्धेची विजेती म्हणून सोडेचार लाख रुपयांचे कॅश प्राइज तर मिळालेच पण तिला एका जाहिरातीसाठीही साइन करण्यात आले आहे. पुढे काय करायचे ठरवले आहेस असे सानियाला विचारले असता, आपल्याला आधी शिक्षण पूर्ण करायचे असून त्यानंतर मॉडलिंग क्षेत्रातच करिअर करायचे असल्याचे सांगितले. या स्पर्धेत मिळालेल्या यशाचे सारे श्रेय ती आपली आई प्राची व वडील प्रशांत चव्हाण यांना देते. अतिशय कमी वयात सानियाने मिळवलेल्या यशाचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.