बलात्कार आणि पॉक्सोच्या आरोपातून दापोलीतील एकाची निर्दोष मुक्तता

विधीज्ञ महेंद्र बांद्रे यांचा युक्तिवाद ग्राह्य

खेड – लॉकडाऊन काळात (डिसेंबर २०२०) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात अडखळ (जि. रत्नागिरी) येथील ३५ वर्षीय राजेश मळेकर या तरुणाची खेड येथील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात आरोपीच्यावतीने दापोलीतील ॲड. महेंद्र बांद्रे यांनी प्रभावीपणे काम पाहिले. त्यांच्या सखोल युक्तिवाद आणि कायदेशीर कौशल्यामुळे आरोपीला निर्दोष मुक्तता मिळाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अडखळ येथील राजेश मळेकर याने एका मुलीशी तिच्या इच्छेविरुद्ध लॉकडाऊन काळात वारंवार शरीरसंबंध ठेवले, असे आरोप करण्यात आले होते. यातून ती गरोदर राहिली आणि तिला अपत्य प्राप्तीही झाली. यानंतर तिच्या आईने दापोली पोलीस ठाण्यात राजेश मळेकर याच्याविरोधात तक्रार दाखल केली. दापोली पोलिसांनी भादंवि ३७६ अन्वये राजेश मळेकरवर गुन्हा दाखल केला.

मुलगी अल्पवयीन असल्याचे गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार सिद्ध झाल्याने राजेश मळेकरवर पॉक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्याचे काम खेड येथील सत्र न्यायालयात चालले. न्यायालयाने या प्रकरणी एकूण १४ साक्षीदार तपासले, ज्यात पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, पोलीस आणि इतर साक्षीदारांचा समावेश होता.

खटल्या दरम्यान पीडित मुलीने आरोपीला ओळखण्यास नकार दिला. तसेच, वैद्यकीय पुराव्यांमध्ये मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले नाही.

महेंद्र बांद्रे यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि कायदेशीर मुद्दे प्रभावीपणे मांडले.

त्यांच्या या युक्तिवादामुळे आणि सादरीकरणामुळे न्यायालयाने राजेश मळेकर याची निर्दोष मुक्तता केली. बांद्रे यांच्या कायदेशीर रणनीतीचे या खटल्यात विशेष कौतुक झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*