मंत्री नारायणराव राणे उद्या चिपळूण दौऱ्यावर, पूरग्रस्तांचे अश्रू पुसणार

पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार

रत्नागिरी : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्री आणि कोकणचे नेते नारायणराव राणे हे उद्या चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून उद्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. उद्या रविवारी सकाळी ९ वाजता मुंबईहून आय ए एफ चॉपर विमानाने मुंबईहून महाडसाठी रवाना होणार असून ते ९.३० वाजता महाडमध्ये पोहोचतील आणि महाडसह पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर महाडमधून सकाळी ११ वाजता निघून मंत्री राणे हे सकाळी ११.२५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे येणार असून तेथून रस्तामार्गे ते चिपळूणला जाणार आहेत. चिपळूण मधील पूरबाधित भागाची पाहणी करून दुपारी २.३० वाजता चिपळूण येथून निघून रत्नागिरीत साडेचार वाजता रस्तेमार्गाने येऊन ४.४५ वाजता विमानाने मुंबईला रवाना होणार आहेत.

या पूरस्थिती पाहणी दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेसुद्धा येणार आहेत. या दौऱ्यात एकूण पूर स्थितीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल मंत्री नारायणराव राणे केंद्राकडे सादर करणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे या कोकण दौऱ्यात कोकणातील रायगड महाडमधील तळये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या जिल्ह्यांमधील आपदग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारचे प्रतिनिधी म्हणून राणे यांचा हा दौरा असून ते झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन केंद्राला अहवाल सादर करणार आहेत. कोकणचे प्रश्न तळमळीने मांडणारे आणि पाठपुरावा करून प्रश्न धसास लावणारे नेते अशी राणे यांची ओळख असून ते या दौऱ्याच्या माध्यमातून संकटग्रस्त कोकणवासीयांना आर्थिक दिलासा देतील, असा विश्वास कोकणवासीय जनतेमधून व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड तालुक्यात अतिवृष्टीने अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले. चिपळूण बाजारपेठ पुराच्या वेढ्यात सापडली तर खेड मधील पोसरे येथेही मोठी दुघटना घडली. अतिवृष्टीने संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने किनाऱ्यावरील गावांमध्ये काही बाजारपेठा, गावांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. राजापूर मध्येही अर्जुना नदीला पूर आल्याने राजापूर बाजारपेठेतही पाणी भरले होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ही अतिवृष्टीने नुकसान झाले असून या सर्व स्थितीचा मंत्री नारायणराव राणे अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*