म्हाडाची परीक्षा अचानक रद्द; जितेंद्र आव्हाडांनी रात्री उशिरा व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली आहे.

परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली आहे. मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने तसंच रात्री उशिरा याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला तसंच म्हाडाच्या वेबसाईटवर एका व्हिडीओ पोस्ट केला असून ही परीक्षा आता पुढील वर्षी होणार आहे अशी माहिती दिली.

म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021

“सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातुन कालच हजारो विद्यार्थी मुंबई, पुणे,बारामती आदी विविध केंद्रात पोहचले आहेत. आता त्यांना मध्यरात्रीच्या घोषणेमुळे निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही घोषणा आधीच किमान कालपर्यंत केली असती तर नाहक धावपळ,त्रास वाचला असता असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*