मुंबई : डोंगर काळ म्हणून कोसळला आणि महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.