संगमेश्वर : तालूक्यात कोविड रुग्णाची वेगाने वाढणारी संख्या आणि त्यासाठी आवश्यक रूग्णालय सुविधेचा प्राधान्याने विचार करत मातृमंदिर संस्थेने डॉ. परमेश्वर गोंड यांच्या एस.एम.एस हॅास्पिटलच्या सहकार्याने देवरुख येथे ३० बेडची अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर सुविधा उपलब्ध केली आहे.

या सेंटरचा लाभ संगमेश्वर तालूका परिसरातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेटये यांनी केले आहे.

कोविडच्या दुसर्या लाटेचा प्रभाव शिमगोत्सवात कोकणात प्रचंड वेगाने फैलावला, संगमेश्वर तालूका हा सह्याद्रीच्या खोर्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश आहे. आजही येथील अनेक भागात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत.

कोव्हिड महामारीचा फैलाव गेल्या महिनाभरात इतका वेगाने पसरला की या खेड्या पाड्यातून वाड्या वाड्यातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. शासकीय यंत्रणा अहोरात्र राबत असतांना तीही कमी पडू लागली.

या तालुक्यात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या दोन अंकी झाली आहे. रूग्णांना रत्नागिरी, चिपळूण येथे जाण्याशिवाय पर्याय नाही. ॲाक्सिजनची व्यवस्था नाही. अशा वातावरणात तहसीलदार थोरात यांनी सुचविले आणि मातृमंदिर कार्यकारीणीने कोव्हिड सेंटर सुरु करण्यासाठी तात्काळ मान्यता दिली.

मातृमंदिर संस्थेची स्थापना मावशी हळबे यांनी पुज्य सानेगुरुजी यांचा मुल्याधिष्ठीत आदर्शांने राष्ट्रसेवा दलाच्या वैचारीक बांधिलकीतून केली. आज राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी सेवादल कार्यकर्त्यांनी संस्थांनी कोव्हिड प्रश्नावर प्राधान्याने काम करण्याचे आवाहन केले . या आवाहनाला प्रतिसाद देत मातृमंदिरने देवरुख येथे आपल्या हॅास्पिटल कॅम्पसमध्ये ३० बेडचे अद्ययावत कोव्हिड केअर रूग्णालय सुरु केले आहे.

डॉ. परमेश्वर गोंड यांचे एस.एम.एस हॅाल्पिटलचे संपुर्ण व्यवस्थापन पुर्ण क्षमतेने काम करत आहे. यांत डॉ. प्रकाश पाटील, डॉ. निकीता धने, डॉ. प्राजक्ता शिंदे पाटील आणि सर्व टीम कार्यरत आहे. इथं ऑक्सिजन आणि आयसीयूची व्यवस्था आहे. गरज वाढल्यास अधिक आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे डॉ. गोंड यांनी सांगितले.

मातृमंदिरच्या या धैर्यशील लोकोपयोगी उपक्रमाने संगमेश्वर तालुक्यांतील जनतेसाठी या भीषण महामारीच्या काळात मोठी सुविधा उपलब्ध केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

या संस्थेचे कार्यवाह आत्माराम मेस्त्री, अनिल अणेराव , विलास कोळपे, नाना कोळवणकर, सुचेता कोरगावकर यांचा मोठा सहभाग आहे