रत्नागिरी: भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रत्नागिरीत राष्ट्रव्यापी ‘जन आक्रोश रॅली’चा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

या मोर्चाद्वारे ईव्हीएम बंदी, जातवार जनगणना, तसेच मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, आदिवासी आणि एस.सी./एस.टी./ओबीसी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अन्याय दूर करण्याच्या मागण्या तीव्रतेने मांडण्यात आल्या.

मोर्चाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि मान्यवर कांशीराम साहेब यांचा जयजयकार करण्यात आला.

‘बोल पंच्याशी-जय मूळनिवासी’, ‘ईव्हीएमने क्या किया -देश का सत्यानाश किया’, ‘गल्ली गल्ली हे शोर है- निवडणूक आयोग चोर है’, ‘ओबीसीची जातवार जनगणना झालीच पाहिजे’, ‘इव्हिएम हटाव -देश बचाव’ आणि ‘महाबोधी महाविहार -मुक्त करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा बामसेफचे समाधान पैठणे, भारत मुक्ती मोर्चाचे विजय जाधव, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे संजय आयरे, भीम आर्मीचे प्रदीप पवार, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार आणि कुणबी समाज क्रांती संस्थेचे सलिल डाफले यांनी केले.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विद्यार्थी संघटनेचे सौरभ आयरे, सामाजिक कार्यकर्ते युयुस आर्ते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रशांत साळुंखे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष काझी साहेब, उबाठा गटाच्या सरपंच नम्रता बिर्जे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेश सचिव बशीरभाई मुर्तूजा आणि आर.पी.आय.चे प्रकाश जाधव यांनी सहभाग घेतला.

या मान्यवरांनी ईव्हीएम बंदी आणि अन्य मागण्यांना पाठिंबा दर्शवला. मोर्चाच्या वतीने ईव्हीएम बंद न केल्यास भविष्यात सनदशीर मार्गाने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या मोर्चाने रत्नागिरी शहरात सामाजिक न्याय आणि लोकशाहीच्या मुद्द्यांवर जनजागृती निर्माण केली.