कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिवस

मराठीचा सर्वत्र अभिमानाने वापर करा. विश्वजित गाताडे

रत्नागिरी: मराठी भाषा आपली बोली भाषा आहे. तिचा सर्वत्र अभिमानाने वापर करावा, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी व मराठी भाषा समिती अध्यक्ष विश्वजीत गाताडे यांनी केले. कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे आज मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी व मराठी भाषा समिती अध्यक्ष विश्वजीत गाताडे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निवास यादव, कवी केशवसुत स्मारक चे अध्यक्ष गजानन पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखा अध्यक्षा नलिनी खेर, कोमसाप रत्नागिरीचे अध्यक्ष चंद्रमोहन देसाई, जिल्हाध्यक्ष आनंद शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना गाताडे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा ही आपली बोली भाषा आहे. तिचा आपल्याला अभिमान आहे आणि आसायला हवा.

आपण सर्वांनी सर्वत्र मराठी भाषेचा वापर करणे गरजेचे आहे. अशा उत्साहाने दरवर्षी असाच कार्यक्रम साजरा करण्यात यावा, असेही ते म्हणाले.

यावेळी कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचे अभिवाचन करण्यात आले. तीर्था पावसकर हिने मराठी अशी ही आमची मायबोली या विषयावर भाषण केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच कविवर्य केशवसुत व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. तर कोमसापचे सचिव विद्याधर कांबळे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागचा उद्देश सांगितला.

यावेळी नागरिक, कवी, लेखक, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*