दापोली प्रतिनिधी

शहरी भागामध्ये मराठी भाषा थोडी फार मागे पडत आहे पण ग्रामीण भागानं खऱ्या अर्थानं भाषा संवर्धनामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे, असं मत माय कोकणचे मुश्ताक खान यांनी व्यक्त केलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दापोली आगारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्याबद्दल त्यांनी उपस्थितांना मोजक्याच पण प्रभावी शब्दात माहिती दिली. मराठी भाषा गौरव दिन हा भाषेचा उत्सव आहे. या दिवशी आपण एकत्र जमतो विचारांची देवाण घेवाण करतो. मराठी भाषा समृद्ध कशी होईल याबद्दल चर्चा करतो. त्यामुळे हा दिवस खुप महत्वाचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी तो साजरा केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

आपले विचार व्यक्त करताना संपादक मुश्ताक खान

मराठी भाषेला आजच्या घडीला धोखा निर्माण झाला आहे, यावर मला विश्वास नाही. जोपर्यंत ग्रामीण भागातील मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा सुरक्षित असल्याचे मतही यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा संवर्धन करणे व मराठी भाषा अधिक सुदृढ आणि सशक्त बनविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार मनोज पवार यांनी येथे व्यक्त केले

यावेळी ते पुढे म्हणाले की मराठी भाषाचे संवर्धन करण्याकरिता फार मोठे कष्ट उपसण्याची गरज नाही प्रत्येकाने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करायला हवा. आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेतच घालावे. ज्यांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आहे अशांनी आपल्या घरी किमान एक मराठी वृत्तपत्र सुरू करून आपल्या पाल्यांना ते वाचण्याची सवय लावावी.

तरूण भारतचे मनोज पवार बोलताना

शिवाय प्रत्येकाने दररोज एक रुपया साठवून वर्षभरात जमणाऱ्या 365 रुपयांत आपल्याला आवडतील ती मराठी पुस्तके विकत घ्यावीत. यातून आपल्याला देखील मराठी भाषेची गोडी लागेल व मराठी भाषेचे साहित्य सुदृढ होण्यासाठी मदत होईल.

कार्यक्रमानिमित्त उपस्थित कर्मचारी वर्ग

कोणत्याही भाषेचे मूल्यमापन करताना त्यात भाषेत निर्मित साहित्याचे साहित्याचा प्राधान्याने विचार करण्यात येतो या करिता प्रत्येक मराठी माणसाने दररोज एक रुपया साठवून त्यातून वर्षातून किमान एक मराठी पुस्तक तरी विकत घ्यावे, असे मत मनोज पवार यांनी येथे बोलताना व्यक्त केले. शिवाय असे करणाऱ्या दापोली आगारातील कर्मचाऱ्यांचा दरवर्षी पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्याची घोषणा देखील मनोज पवार यांनी यावेळी बोलताना केली.

मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना

यावेळी बोलताना आगार व्यवस्थापिका रेश्मा मराळे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी काय करायला पाहिजे याबाबत उहापोह केला.

या कार्यक्रमाप्रसंगी दापोली आगारातील हर्षद नाफडे, मिलन कांबळे, सुशांत सावंत, मुनाफ राजापकर यांच्यासह अनेक कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले.