रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाऊंट काढून २३ जणांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला आहे. त्यांच्या माध्यमातून जनजागृती आणि फसवणुकीच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे. १८ बनावट अकाऊंट सायबर पोलिसांनी बंद करून फसवणूक रोखली आहे. कोरोना महामारीच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. टाळेबंदी असल्याने जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारावर भर देण्यात आला. त्याचा फायदा काही सायबर गुन्हेगार उठवित आहेत. नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांची फसवणूक सुरू आहे. पोलीस, बँकेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे जनजागृती सुरू आहे. तरी नागरिक आमिषाला बळी पडून फसवणूक करून घेत आहेत.
वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी जिल्ह्यात सायबर साक्षरता निर्माण व्हावी, याकरिता सायबर एहसास उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी फसव्या योजना आणि आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.