मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
दापोली : तालुक्यातील सडवे गावचा एक बाल मुर्तिकार मंथन महेश टेमकर म्हणजे एक उदयोन्मुख चित्रकार असल्याचे त्याने तयार केलेल्या गणेश मुर्ती पाहून वाटते, असे त्याचे स्नेही मनिष जागडे यांनी सांगितले.
कोणत्याही प्रकारच्या कलेची पार्श्वभूमी नसलेल्या, एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला मंथन हा छोटासा मुलगा. लहान असल्यापासून त्याला माती, कागद आणि पेन्सीलची आवड.
सतत चित्र काढणेत व्यस्त असतो. जणू मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तसे इयत्ता चौथीच्या वर्गात म्हणजे सुमारे पाच वर्षापासून त्याने अनेक प्रकारची चित्रे रेखाटून, रंगवलेली आहेत.
विशेषता गणेश मुर्तीची आवड असलेल्या मंथनने अजून चित्रकलेची कोणतीही परीक्षा दिलेली नाही;तरीही समोर असेल ते चित्र हुबेहूब रेखाटणे हे त्याचे वैशिष्ट्ये.
गतवर्षी सातवीच्या वर्गात असताना दापोली येथे संतोषभाई मेहता शैक्षणिक संस्थेच्यावतीनं आयोजीत चित्रकला स्पर्धेतही त्याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले होते.
मातीत मती मिसळता मोती मिळतात, तसे त्याने हस्तकौशल्याने नुकत्याच काही गणेश मुर्ती तयार केल्या आहेत. पर्यावरण पूरक आणि साध्या चिकण मातीपासून तो मुर्ती साकारतो.
गांडूळांनी भुसभुसीत केलेल्या मातीपासून त्याने सुबक अशी मुर्ती तयार केली आहेत. साधे रंग वापरुन ती रंगवली आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मुर्ती तयार करु नयेत आणि त्या वापरूही नयेत असे मंथन सांगतो.
ग्रामीण भागात मंथन सारखे असे अनेक हरहुन्नरी बालकलाकार आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना प्रोत्साहन, पाठबळ देऊन त्यांच्या कलेला संधी देण्याची.