मुंबई/नाशिक : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीच्या ३० वर्षांपुर्वीच्या प्रकरणात त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आणि अटक वॉरंट जारी केल्यानंतर हा राजीनामा आला आहे.

या प्रकरणात कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनाही शिक्षा झाली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी कोकाटे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तात्पुरते सोपवले आहे. नवीन मंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय अजित पवार घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोकाटे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, निकालाच्या अधीन राहून पुढील कारवाई होईल. सध्या ते आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत.

या घटनेमुळे महायुती सरकारातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.