दापोली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे, असे मत महाराष्ट्र भाजपाचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ यांनी व्यक्त केले.
दापोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे उत्तर जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रदेश निमंत्रित सदस्या स्मिता जावकर, तालुका अध्यक्ष संजय सावंत, सोशल मिडिया तालुका संयोजक धिरज पटेल उपस्थित होते.

हा अर्थसंकल्प सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढवणारा, त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना देणारा, १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वासही अवधूत वाघ यांनी व्यक्त केला.
अवधूत वाघ पुढे म्हणाले की, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्त्वाची पावले उचलली आहेत.
सामाजिक क्षेत्र, लहान मुले व युवा शिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणार आहे, असा दावाही त्यांनी केला.
ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता वाढ, रोजगारनिर्मिती, MSME क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि नवी गुंतवणूक तसेच जागतिक स्तरावर आर्थिक स्पर्धेला तोंड देण्यास सज्ज असे निर्यात क्षेत्र या चार प्रमुख आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
करप्रणाली, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय सुधारणा, ऊर्जा आणि नियामक सुधारणा या सहा क्षेत्रांतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अवधूत वाघ म्हणाले की, पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना, खाद्यतेल आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षाची विशेष मोहीम, मखाना आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ, फळ-भाजीपाला उत्पादक व कापूस शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, युरिया आत्मनिर्भरता योजना यांसारख्या महत्वपूर्ण योजनांमुळे देशातील अन्नदाते अधिक सक्षम होतील.
याशिवाय पाच ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना, ‘भारतीय भाषा पुस्तक योजना’, सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबॅड कनेक्टिव्हिटी, ५०,००० अटल टिंकरिंग लॅब्स यांसारख्या महत्वपूर्ण शैक्षणिक तरतुदींमुळे भारतातील विद्यार्थी जागतिक दर्जाच्या शिक्षणाने सक्षम होतील.
देशाच्या उज्वल भविष्यासाठी मध्यमवर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजावर TDS मर्यादा ₹ ५०,००० वरून ११ लाख, घरभाड्यावर TDS मर्यादा १२.४० लाख वरून १६ लाख यांसारख्या महत्वाच्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल.
सामाजिक विकासासोबतच पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, शाश्वत आर्थिक विकास, तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, MSME आणि निर्यात यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून लघु व मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत असेही अवधूत वाघ यांनी सांगितले.
जन आरोग्य योजना, सक्षम आंगणवाडी व पोषण २.० कार्यक्रम, गिग वर्कर्सचे कल्याण आणि जलजीवन मिशन यांसारख्या योजनांना अधिक बळ देत सामाजिक न्याय व जनकल्याणालाही सरकारने प्राधान्य दिले आहे असेही अवधूत वाघ म्हणाले.