दापोली : दापोली शहरातील बाजारपेठेत असलेल्या समर्थ मेडिकलचे मालक महेश भांबुरे यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून स्वतःला संपवल्याची माहिती पुढे येत आहे.
या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला दापोली सारख्या शहरांमधील ही घटना म्हणजे मनाला चटका लावून जाणारी होती. दरम्यान, प्रसिध्द मेडिकल व्यावसायिक असलेल्या भांबुरे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश भांबुरे यांनी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास कीटकनाशक औषध घेतल्याने ते अत्यवस्थ झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. औषधोपचार सुरू असताना दुपारी १२.४० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
महेश भांबुरे हे दापोलीमधील मेडिकल व्यवसायामधील प्रसिध्द असे व्यक्तीमत्व होते. दापोली तालुका मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष देखील होते.
बुधवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या मेडिकल स्टोअर्समध्ये आले होते. तेथील कामगारांना थोड्यावेळाने येतो, असे सांगून बाहेर पडले. त्यानंतर ते गिम्हवणे येथे गेल्याचे समजते. काही वेळानं ते गिम्हवणे येथील गजानन महाराज मंदिराजवळ बेशुध्द अवस्थेत पडल्याचे आढळून आले.
त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचा जीव काही वाचू शकला नाही.
दरम्यान, महेश भांबुरे यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असेल हे कळायला मार्ग नाहीये. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक नलावडे करीत आहेत.