महायुतीत खेडमध्ये तणाव: जागावाटपावरून भाजप नेत्यांचा राजीनामा देण्याचा इशारा

दापोली – कोकणातील खेड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने भाजपला अवघ्या तीन जागा देऊन बोळवण केल्याचा आरोप करत खेड, दापोली आणि मंडणगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी दापोली येथील पक्ष कार्यालयात बैठक घेऊन महायुतीमध्ये विश्वासात घेतले न गेल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला. ही एकतर्फी युती मान्य नसल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे.

बुधवारी सकाळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटाला यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपला नगरसेवक पदाच्या तीन जागा सोडल्या असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ही घोषणा करताना भाजपला विश्वासात घेतले का, असा प्रश्न उपस्थित झाला. भाजप नेत्यांनी विचारले, “आमच्या एकाही नेत्याला याबाबत माहिती नसेल तर ही युती कोणी केली?”

या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी दापोलीत बैठक घेतली. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रवेशाने खेडमध्ये भाजपची ताकद वाढली असताना शिवसेनेने सन्मानपूर्वक जागावाटप करावे, अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ तीन जागा देऊन शिवसेनेने भाजपची चेष्टा केल्याचा संदेश मतदारांमध्ये गेला आहे.

भाजपने उपनगराध्यक्षपद आणि किमान ८ ते ९ जागांची मागणी केली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बैठकीला माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, सरचिटणीस भाऊ इडाते, महिला अध्यक्षा स्मिता जावकर, जिल्हा सचिव अक्षय फाटक, दापोली तालुकाध्यक्षा जया साळवी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

केदार साठे यांनी सांगितले, “शिवसेनेने दिलेल्या तीन जागा हा अपमान आहे. तसेच, वैभव खेडेकर आणि सूर्यकांत दळवी यांच्याबाबत योगेश कदम यांनी वापरलेली अपमानास्पद भाषा आम्ही निषेध करतो. आमच्या नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. महायुतीमध्ये आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही तर राजीनामा देणार आहोत.”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*