‘सत्तापिपासू शिवसेना-भाजप सरकार: राज्यात अहंकार, मानापमानाचा खेळ सुरू’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तापिपासू आहे. सत्तेतील तीन पक्षांच्या टोळ्यांमध्ये अहंकार, मानापमान खेळ सुरु आहे.

त्यामुळे राज्यात होणारे खून, महिलांवरील अत्याचार सत्ताधार्‍यांच्या नजरेत येत नाहीत. भाजपाचे मंत्री नितेश राणे बेताल वक्तव्य करून राज्याची शांतता बिघडवत आहेत.

काँग्रेस हे शांतपणे पाहणार नाही. सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने कसे राहतील यासाठी काँग्रेसने भूमिका स्विकारली आहे. यातूनच पक्षालाही सावरले जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नुतन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सिंधुदुर्गपासून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. रविवारी ते रत्नागिरीत होते.

त्यांच्यासोबत आ. भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, जिल्हा प्रभारी मनेष राऊत, ज्येष्ठ नेते रमेश कीर, संजय उर्फ बाळा मयेकर, हारिश शेकासन आदी उपस्थित होते.

आपला दौरा ही एक सद्भावना पदयात्रा असून यातून पक्षपुर्नबांधणी होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. राज्यातील भाजप प्रणित सरकारने सभ्यता संस्कृती, परंपरा, संविधानाची मुल्ये पायदळी तुडवली आहेत. राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकरी, मजूर, बेरोजगार, महिलांवरील अत्याचार याकडे सरकारचे लक्षच नाही.

केंद्रिय मंत्र्यांची कन्याही सुरक्षित राहिलेली नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टिका केली.

राज्यसरकारमधील मंत्र्यांकडूनच शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडला जात आहे.

त्यामुळे समाज स्वास्थ बिघडले आहे. एकप्रकारे समाजातील सद्भावनाच लयाला गेली असून आका आणि खोके रिटर्न संस्कृती वाढीस लागली असल्याचा आरोप केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*