मुंबई : राज्यातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मद्य विक्री करणाऱ्या आस्थापनांना वगळता, राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापना आता 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला असून, यामुळे ‘नाईट इकॉनॉमी’च्या संकल्पनेला मोठे बळ मिळणार आहे. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघासह राज्यभरातील व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.

काय आहे हा निर्णय?

‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, 2017’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना दिवस-रात्र कधीही खरेदी आणि सेवांचा लाभ घेता येणार आहे. यातून व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढण्याबरोबरच नागरिकांची सोय होईल आणि राज्याच्या अर्थचक्राला नवी दिशा मिळेल.

24 तास सुरू राहणार या आस्थापना

  • सर्व प्रकारची दुकाने
  • निवासी हॉटेल्स
  • उपाहारगृहे (रेस्टॉरंट्स)
  • खाद्यगृहे (इटरीज)
  • थिएटर आणि सिनेमागृहे
  • सार्वजनिक मनोरंजन आणि करमणूक स्थळे
  • इतर व्यावसायिक आस्थापना

वेळेचे बंधन असणाऱ्या आस्थापना

शासनाने काही आस्थापनांना या सवलतीतून वगळले आहे. त्यांच्यावर वेळेचे निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू राहतील:

  • मद्यपान गृहे (Permit Rooms)
  • बार
  • हुक्का पार्लर
  • देशी दारूची दुकाने

कर्मचाऱ्यांचे हक्क अबाधित

या निर्णयात कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात आले आहे. अधिनियमातील कलम 16 (1) (ख) नुसार, आस्थापना आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरू ठेवता येतील, परंतु प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एकदा सलग 24 तासांची साप्ताहिक सुट्टी देणे मालकांना बंधनकारक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे शोषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासनाच्या गोंधळावर स्पष्टता

अनेक शहरांमध्ये मद्य विक्री न करणाऱ्या आस्थापनांनाही 24 तास सुरू ठेवण्यापासून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी रोखल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्या होत्या. यावर आता शासनाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. केवळ मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांनाच वेळेचे बंधन असेल, इतर सर्व आस्थापना 24 तास सुरू ठेवता येतील आणि स्थानिक प्रशासनाने त्यांना अडवू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अर्थव्यवस्थेला चालना

या निर्णयामुळे रात्रीचे अर्थचक्र गतिमान होईल, अशी अपेक्षा आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने पर्यटनाला चालना मिळेल. तसेच, दोन किंवा तीन शिफ्टमध्ये काम करण्याची संधी निर्माण झाल्याने रोजगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करताना राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.