लोटे परशुराम येथील ‘PFAS’ प्रकल्पाविरोधात ६ एप्रिलला जनआक्रोश; लक्ष्मी ऑर्गेनिकसमोर भव्य मोर्चाचे आयोजन

खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने प्रस्तावित केलेल्या PFAS (पर- आणि पॉलिफ्लुओरोअल्काईल पदार्थ) उत्पादन प्रकल्पावरून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे.

या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या ६ एप्रिल रोजी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘कोकण नागरी संघर्ष समिती’ आणि ‘लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती’ यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभारला जात आहे.

मागील ७२ दिवसांपासून ग्रामस्थांनी या प्रकल्पाच्या निषेधार्थ बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. आता हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

“उद्योग हवा, पण आरोग्याच्या किमतीवर नको” अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी इटलीतील वादग्रस्त ‘मिटेनी’ कंपनीची जुनी यंत्रसामग्री वापरली जात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणवादी संघटनांनी केला आहे, ज्यामुळे स्थानिक जनतेमध्ये अविश्वासाचे आणि भीतीचे वातावरण आहे.

PFAS हे रसायन जगभरात “फॉरेव्हर केमिकल्स” म्हणून ओळखले जाते, कारण ते निसर्गात कधीही नष्ट होत नाही. हे घटक पाणी, माती आणि मानवी शरीरात दीर्घकाळ साठून राहतात. शास्त्रज्ञांच्या मते, या रसायनांमुळे कर्करोग, यकृताचे विकार, थायरॉईड आणि हार्मोनल असंतुलन यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.

कोकणासारख्या निसर्गसंपन्न आणि संवेदनशील भागात अशा धोकादायक उद्योगामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत कायमचे प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांनी सरकारसमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये PFAS चे उत्पादन तातडीने थांबवणे, प्रदूषणाची निष्पक्ष चौकशी करणे, या रसायनांचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा शास्त्रीय अहवाल सार्वजनिक करणे आणि तातडीने जनसुनावणी घेणे यांचा समावेश आहे.

सध्या जिल्हा प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसरीकडे, राज्य सरकारने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानंतरच पुढील पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

६ एप्रिलचा हा मोर्चा या संघर्षाला नेमकी कोणती दिशा देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*