रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. रत्नागिरी शहर परिसरात मिरजोळे-नाचणकर चाळ येथे 477 ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थासह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत आरोपी लक्ष्मण रवी नायर (वय 34, रा. नाचणकर चाळ, मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 1,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दिनांक 03/04/2025 रोजी गस्त घालणाऱ्या पथकाला एका रिक्षा चालकाच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. चौकशीदरम्यान त्याची ओळख लक्ष्मण रवी नायर अशी झाली, जो यापूर्वी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्या ताब्यातील पिशवीची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यात 477 ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 129/2025 अंतर्गत एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 22(अ), 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून 477 ग्रॅम गांजा आणि एक ऑटो रिक्षा (क्रमांक MH08-AQ-1665) असा एकूण 1,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करत आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून यात सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, गणेश सावंत, प्रवीण खांबे आणि सत्यजित दरेकर यांचा समावेश आहे.