रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अमली पदार्थासह एकाला अटक केली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे.

२५ जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळ नाका ते एस.टी. कॉलनी रस्त्यावर गस्त घालत असताना, पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार अद्वैत संदेश चवंडे (वय २३, रा. साळवी स्टॉप, ता. जि. रत्नागिरी) मोटरसायकलवर संशयास्पद हालचाली करताना आढळला. त्याच्यावर संशय आल्याने पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत त्याच्या ताब्यातील साहित्याची तपासणी केली. तपासणीत त्याच्याकडील पिशवीत ८ ग्रॅम वजनाच्या ८८ पुड्या ‘ब्राऊन शुगर टर्की’ सदृश्य अमली पदार्थ मिळून आल्या.

पथकाने अद्वैत चवंडे याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ४४,००० रुपये किमतीचा ‘ब्राऊन शुगर टर्की’ आणि एकूण १,४४,००० रुपये किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेषराव शिंदे, सहायक पोलीस फौजदार सुभाष भागणे, पोलीस हवालदार शांताराम झोटे, बाळू पालकर, अमित कदम, गणेश सावंत आणि प्रवीण खांबे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*