रत्नागिरी:- मंडणगड, दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार्‍या भागात दि. २० ते २२ डिसेंबर या सलग तीन दिवशी दारू विक्री बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत.
मंडणगड, दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १८७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका देखील दि. २१ डिसेंबरला होणार असून दि. २२ डिसेंबरला मतमोजणी सुरू आहे. यासाठी दि. २० ते २२ डिसेंबर या कालावधीत दारूविक्रीची दुकाने बंद राहणार आहे.

ज्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल तेेथे सदरचे आदेश लागू होणार नाहीत. निवडणुका खुल्या, मुक्त, निर्भय वातावरणात संपन्न व्हाव्यात यासाठीच सलग तीन दिवस देशी, विदेशी मद्य, माडी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी एन. पाटील यांनी दिला आहे.

या कालावधीत दारूची दुकाने उघडी राहिल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४, ५६ मधील तरतुदीनुसार संबंधित दुकानांची अनुज्ञप्त कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.