
रत्नागिरी : शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लिलाबाई गंगाराम कदम यांचे आज (सोमवार, ९ डिसेंबर २०२५) वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय १०० वर्षांपेक्षा अधिक होते. दीर्घकाळ आजारी असलेल्या लिलाबाई कदम यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.
लिलाबाई कदम या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम (रामदास कदम यांचे पुत्र) यांच्या आजी होत्या. अत्यंत शांत स्वभावाच्या, सर्वांना प्रेमाने वागवणाऱ्या आणि धार्मिक वृत्तीच्या असलेल्या लिलाबाईंच्या मार्गदर्शनामुळे कदम कुटुंबातील अनेक सदस्य समाजकारण व राजकारणात पुढे आल्याचे मानले जाते.
त्यांच्या निधनाने कदम कुटुंबासह खेड तालुक्यातील जामगे आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूसमयी त्यांच्या मागे चार मुले, सुना, जावई, अनेक नातवंडे, पतवंडे, नातसुना आणि नातजावई असा मोठा परिवार आहे.
लिलाबाई कदम यांचे पार्थिव आज दुपारी १ वाजता जामगे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निधनाची बातमी कळताच कुटुंबीय, नातेवाईक, गावकरी आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने जामगे येथे दाखल होऊ लागले आहेत.
स्थानिक राजकीय व सामाजिक वर्तुळातून तसेच सोशल मीडियावर लिलाबाई कदम यांना अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. कदम कुटुंबाला या दुःखात धीर लाभो, अशा भावना व्यक्त होत आहेत.

Leave a Reply