रत्नागिरी: खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि पॅरोलवर फरार झालेला न्यायबंदी चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (वय 33) याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नवी मुंबईतून जेरबंद केले आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या या न्यायबंदीला आज, 20 जून 2025 रोजी ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने फरार न्यायबंदी आणि पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविली होती.
या मोहिमेदरम्यान, मरगाव शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 332/2011 (भा.दं.वि.सं. कलम 302, 364, 201) अंतर्गत गोव्यातील कोलवाड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगत असलेल्या चन्नाप्पा गंगवार याला 11 जुलै 2024 ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीसाठी 30 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती.
पॅरोल रजेदरम्यान चन्नाप्पा रत्नागिरीत वास्तव्यास होता आणि त्याला 9 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी कोलवाड कारागृहात हजर राहणे बंधनकारक होते.
मात्र, तो विहित मुदतीत कारागृहात परत न आल्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 374/2024 (भारतीय न्याय संहिता 2023, कलम 262) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहितीच्या आधारे चन्नाप्पा नवी मुंबईत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारावर पथकाने सापळा रचून चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (राहणार: कस्टोडिया दियास, लयामती दावोलींम, सालसेट, गोवा; मूळ गाव: कुमाटगी, विजापूर, कर्नाटक) याला नवी मुंबईतून ताब्यात घेतले.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी पार पाडली.
रत्नागिरी पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे फरार न्यायबंदीला जेरबंद करण्यात यश आले असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे.