केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया: संजय जंगम

दापोली : बदलत्या शिक्षण प्रणालीत काळानुसार स्वत:मध्ये योग्य बदल घडवून केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, शिवाजीनगर-साखळोली येथे आयोजित कोळबांद्रे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील मुलींनी सुस्वर ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. यावेळी संजय जंगम आणि महेश शिंदे यांनी संगीतसाथ दिली. त्यानंतर मंगेश कडवईकर यांनी पायाभूत जीवन कौशल्य विकासाची काळाची गरज यावर, समीर ठसाळ यांनी इयत्ता पहिलीच्या भाषा विषयाच्या अध्ययन निष्पत्तींवर, मनोहर सनवारे यांनी केंद्रस्तरीय शिक्षक समूहावर आणि नेहा उकसकर यांनी मासिक पाळी आणि आरोग्य यावर सखोल मार्गदर्शन केले. नेहा उकसकर म्हणाल्या, “मासिक पाळी हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. किशोरवयीन मुलींना यासाठी योग्य स्वच्छता आणि काळजी घेण्यास सक्षम करणे आवश्यक आहे. त्यांना सात्विक आधार देणे गरजेचे आहे.” तर समीर ठसाळ यांनी सांगितले की, “अभ्यासक्रम हे साध्य आहे, तर पाठ्यपुस्तके ही साधने आहेत. अध्ययन निष्पत्तीसाठी कोणतेही साधन वापरता येईल.”

या परिषदेत गणवेश, पाठ्यपुस्तके यांचा आढावा घेण्यात आला तसेच विविध प्रशासकीय कामकाजावर चर्चा झाली. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक महेंद्र कलमकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास सकपाळ यांनी केले. यावेळी संजय जंगम, संजय मेहता, शामराव वरेकर, मनोहर सनवारे, महेंद्र कलमकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*