दिल्ली : भारतीय वायुसेना पहिल्यांदाच मिग-२९ स्क्वाड्रन आपल्या महिला लढाऊ पायलटकडे सोपविण्याच्या तयीरत आहे. फोर्समध्ये महिला उडविणार असणारे हे चौथ्या प्रकारचे लढाऊ विमान असेल. यासंबंधीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय वायुसेनेच्या महिला पायलटने पूर्वीदेखील मिग-२१ बायसन, सुखोई-३० व राफेलसारखी विमाने उडविली आहेत. वायुसेनेने पाच वर्षांपूर्वीच सशस्त्र दलात महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात सहभागी करणे सुरू केले होते.एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, वैमानिकांना निर्धारित मापदंडानुसार लढाऊ स्क्वाड्रनला सोपविण्यात आले आहे व याचा लिंगाशी काहीही संबंध नाही. गेल्यावर्षी वायुसेनेच्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांना अंबाला येथील आपल्या पहिल्या राफेल स्क्वाड्रनला असाइन करण्यात आले होते. २०१५ मध्ये वायुसेनेच्या लढाऊ विमानात सहभागी होण्यासाठी प्रायोगिक योजनेनंतर २० महिला वैमानिकांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात कमिशन देण्यात आले होते, जे वायुसेनेच्या इतिहासात एक वॉटरशेड होते. यातील अनेकांनी मिग-२१ पासून सुरुवात केली आहे.एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुरुष किंवा महिला लढाऊ पायलटच्या कामगिरीत कोणताही फरक नसतो. ते एक विशिष्ट भूमिका निभावण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिक आहेत. गेल्या दशकात वायुसेनेच्या मिग-२९ ला नवीन एव्हियोनिक्स, हत्यारे, रडार व हेलमेट माउंटेड डिस्प्लेसहित अपग्रेड करण्यात आले होते. सद्यस्थितीत लष्कर, नौसेना व वायुसेनेत ९,११८ महिला सेवा देत आहेत. गेल्या ६ वर्षांमध्ये लष्करात सामील होणाऱ्या महिलांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे.