रत्नागिरी : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर रत्नागिरी मत्स्य व्यवसाय खाते अधिक सक्रिय झाले आहे.
दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी मध्यरात्री एलईडी लाईट वापरणाऱ्या एका नौकेवर मोठी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत नौकेसह तांडेल आणि चार खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात हलविण्यात आली आहे.
अशी झाली कारवाई
12 मार्च 2025 रोजी रात्री 1:30 च्या सुमारास लाडघर-बुरोंडीच्या समुद्रात (17°42’15.9″N 72°56’41.6″E) रत्नागिरी मत्स्य विभागाचे अधिकारी गस्त घालत होते.
यावेळी त्यांना ‘अब्दुल गफूर’ (नोंदणी क्रमांक: IND-MH-4-MM-6007) नावाच्या नौकेवर अनधिकृतपणे एलईडी लाईट वापरून मासेमारी सुरू असल्याचे आढळले.
या नौकेचे मालक यासिन अब्दुल गफूर मुकादम (रा. खडप मोहल्ला, रत्नागिरी) आहेत. अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत नौका ताब्यात घेतली.
या नौकेत मासेमारीसाठी वापरण्यात येणारे एलईडी लाईट आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत, परंतु नौकेवर कोणतीही मासळी आढळून आलेली नाही.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान
सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर आणि मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली.
या कारवाईमध्ये अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी स्वप्नील चव्हाण, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी प्रशांत येळवे आणि योगेश तोस्कर, राजन शिंदे, मंदार साळवी, ज्ञानेश्वर अजगोलकर, विशाल यादव, शिवकुमार सिंग यांच्यासह गस्ती नौका ‘रामभद्रा’ वरील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.