दापोली : क्षितिज कलामंच दापोली यांच्या वतीने शिवजयंती यंदा एका अनोख्या पद्धतीने साजरी होणार आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, १८ तारखेला एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शालेय विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकांचे वाचन करून महाराजांच्या कार्याचा जागर करणार आहेत.
या उपक्रमात न्यु इंग्लीश स्कुल टाळसुरे, न.का. वराडकर हायस्कुल मुरुड आणि चंद्रनगर जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थी एकाच वेळी सहभागी होणार आहेत.
सर्व विद्यार्थी एकाच वेळी पुस्तके वाचायला सुरुवात करतील आणि महाराजांच्या प्रेरणादायी जीवनातील विविध घटना, त्यांचे शौर्य, त्यांची रणनीती आणि प्रजाहितदक्षता यांसारख्या गुणांचा अनुभव घेतील.
क्षितिज कलामंचचे संस्थापक अध्यक्ष सुनील कदम म्हणाले,
“आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या मूल्यांची ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त जयंती साजरी करण्यापेक्षा, त्यांच्या कार्याचा अभ्यास करणे, त्यांच्या विचारांना आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे. आम्हाला विश्वास आहे की या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराजांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळतील आणि ते एक आदर्श नागरिक बनण्यास प्रवृत्त होतील.”
स्थापक अध्यक्ष सुनील कदम
यापूर्वी देखील क्षितिज कलामंचने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक वाचनाचा उपक्रम आयोजित केला होता, ज्याला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या उपक्रमाबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये उत्सुकता आहे.