रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्‍तांची (सीआरएस) तपासणी झाल्यानंतर महिन्याभरात या मार्गावरील गाड्या विजेवर चालतील, असे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. कोकण रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणासह दुपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. विजेवर इंजिन चालवण्याची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली आहे. सीआरएसची चाचणी झाली की रत्नागिरी ते रोहा या भागात विजेवर गाड्या चालवण्यात येतील. सुरवातीला मालवाहतूक करणाऱ्या गाड्या चालवून पाहिले जाईल. त्यानंतर प्रवासी वाहतुकीला सुरवात केली जाईल. यासाठी लागणारी वीज महावितरणच्या ग्रीडमधून घेण्यात येणार आहे. संबंधितांशी करारही झालेला आहे. साधारणपणे 70 मेगावॅट वीज महिन्याला लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. रत्नागिरीतून पुढे वेरणापर्यंतचे सुमारे 200 किमीहून अधिकचे काम पूर्ण होण्यासाठी जूनमध्ये उजाडेल. विजेवर चालणारी इंजिनेही येथे उपलब्ध ठेवली आहेत. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या तिकिटांच्या दरासह नवीन गाडी सुरू करण्याचे निर्णय हे केंद्रस्तरावर होतात. रेल्वे मंत्रालयाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरू करण्यासाठी आदेश मिळालेले नाहीत. लोकल गाड्या अन्य रेल्वेमार्गावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेसाठीही सूचना येतील. रत्नागिरी रेल्वेस्थानकात प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडविल्या जातील, असे आश्‍वासन गुप्ता यांनी दिले.