
खेड : येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे खेड तालुका बौद्ध सेवा संघ महिला समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रामुख्याने महिलांमधील अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर, पंचायत समिती सदस्य अपूर्वा जाधव, महिला समितीच्या अध्यक्षा स्वाती जाधव, सचिव अपूर्वा पवार, गायक तेजस्वी कांबळे, तेजश्री जाधव आणि विशाखा चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक सचिन गोवळकर यांनी महिला आणि त्यांच्या आयुष्यात घर करून असलेल्या विविध अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला.
समाजात आजही अनेक रूढी, परंपरा आणि चुकीच्या समजुतींच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरत असून, याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्य, स्वातंत्र्य आणि निर्णयक्षमतेवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोणत्याही गोष्टीचा आंधळेपणाने स्वीकार न करता त्यामागील वैज्ञानिक कारण समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच घरातूनच विवेक, समता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला समितीच्या अध्यक्षा स्वाती जाधव यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून दिले.
शिक्षणाची दारे खुली झाल्यामुळे आणि संविधानाने दिलेल्या हक्कांमुळेच महिलांना प्रगतीची संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले.

या सोहळ्याचे औचित्य साधून खेडमधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. अपूर्वा पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांमध्ये या प्रबोधनपर कार्यक्रमामुळे विचारांची नवी दिशा मिळाल्याची भावना निर्माण झाली.

Leave a Reply