दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या ‘ग्रामीण जनजागृती कार्यानुभव (RAWE)’ अंतर्गत केळशी गावात कार्यरत इंद्रधनू आणि वसुधा गटांच्या वतीने रानमाया रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाला गावच्या सरपंच सौ. श्रेया मांडवीलकर, डॉ. रणजित महाडिक, रावे प्रमुख डॉ. विजय देसाई, कनिष्ठ संशोधन सहाय्यक शिल्पा नाईक, रावे प्रोग्राम ऑफिसर डॉ. प्रविण झगडे, उप कृषी अधिकारी आणि उदय जोशी यांची उपस्थिती लाभली.
रानमाया रानभाजी प्रदर्शनाचे उद्घाटन श्रेया मांडवीलकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात ३८ विविध रानभाज्यांचे माहितीफलक आणि प्रत्यक्ष नमुने सादर करण्यात आले.
महिलांनी रानभाज्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सादरीकरण पाककृती स्पर्धेत केले. या स्पर्धेत ५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे परीक्षण शिल्पा नाईक यांनी केले, ज्यांनी चव, पोषणमूल्य, सादरीकरण आणि नाविन्यता यांच्या आधारावर मूल्यांकन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. रावे विद्यार्थिनींनी मान्यवरांचे रानफुलांपासून बनवलेल्या पुष्पगुच्छांनी स्वागत केले. डॉ. प्रविण झगडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली.
डॉ. रणजित महाडिक, शिल्पा नाईक, डॉ. विजय देसाई आदींनी श्रावण महिन्यातील रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी गुणधर्मांवर प्रकाश टाकला.
त्यानंतर पाककृती स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. प्रथम क्रमांक आरती कोठारे, द्वितीय क्रमांक सुप्रिया परांजपे, तृतीय क्रमांक दीप्ती मिसाळ आणि उत्तेजनार्थ सानिका वर्तक यांनी पटकावला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपात सरपंच श्रेया मांडवीलकर यांनी RAWE विद्यार्थिनींचे आणि गावातील उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रम आभारप्रदर्शनाने संपन्न झाला.
हा सोहळा समृद्ध खाद्यपरंपरा, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सशक्तीकरणाचा सुंदर संगम ठरला. सहयोगी अधिष्ठाता डॉ. एल. आर. कुणकेरकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण झगडे, समन्वयक डॉ. आनंद मयेकर, रावे प्रमुख डॉ. विजय देसाई आणि विषय विशेषज्ञ डॉ. महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला.