चिपळूण पत्रकार हल्ला: दापोलीत तीव्र निषेध

चिपळूण : येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेने पत्रकारितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेचे दापोली तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.

कर्तव्य बजावत असताना पत्रकारावर हल्ला होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली.

या घटनेच्या निषेधार्थ दापोलीतील पत्रकारांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना लेखी निवेदन सादर केले.

या निवेदनात हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“हल्लेखोरांना त्वरित अटक करून कायद्याचा धाक दाखवला नाही, तर अशा घटना वाढण्याची भीती आहे,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदनावर दापोलीतील पत्रकार मनोज पवार, शैलेंद्र केळकर, महेश महाडिक, प्रसाद रानडे, आनंद करमरकर, राधेश लिंगायत, बाळासाहेब नकाते, सलीम रखांगे, प्रशांत परांजपे, प्रशांत कांबळे, जगदीश वामकर, शमशाद खान, रुपेश वाईकर, ज्योती बिवलकर आदींच्या सह्या आहेत.

प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

चिपळूण येथील या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*