रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची चौकशी व्हावी, अशी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, जालन्यात अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश आंदोलन शांततेने सुरु असताना आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. शांततेने सुरु असलेले आंदोलनावर लाठीचार्ज करणे हे अन्यायकारक असून ह्याचा रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. जालन्यात अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज कुणाच्या सुचनेवरुन झाला आणि लाठीचार्ज करण्याची आवश्यकता होती का याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.
महाराष्ट्रामध्ये कुठलाही समाज असेल, शेतकरी असतील, महीला असतील आंदोलनाला बसायला आपल्या संविधनाचा आपल्याला अधिकार आहे आणि तो अधिकार सर्व सामान्य जनतेला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिला आहे. प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये मागण्या मांडण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारावर अशाप्रकारे पोलीसी बळाचा वापर होणे योग्य नाही.
तरी वरील गंभीर बाबींची दखल घेऊन जालन्यात अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज कुणाच्या सुचनेवरून झाला आणि लाठीचार्ज करण्याची आवश्यकता होती का याची सखोल चौकशी संबंधित प्रशासनाकडून करण्यात यावी ही नम्र विनंती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरीचे जिल्हा अध्यक्ष सुदेश मयेकर याच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, माजी सभापती कुमार शेट्ये, तालुका अध्यक्ष राजन सुर्वे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष सिध्देश शिवलकर, युवक जिल्हाध्यक्ष संकेत कदम, युवक तालुका अध्यक्ष राजेश भाटकर, महिला अध्यक्ष नेहाली नागवेकर, शहराध्यक्ष निलेश भोसले, शहर कार्याध्यक्ष अभिजित गुरव, गुहागर तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष मुजफ्फर काजी, मिरकरवाडा अध्यक्षा फरजाना मस्तान, माजी नगरसेवक सहिद पावसकर, अल्पसंख्यांक महिला तालुका उपाध्यक्ष आलिया मजगावकर, रणजित शिर्के, नजीर वाडकर आदी उपस्थित होते.