दापोली : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मळे (ता. दापोली) येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील ‘कृषी जीविका’ व ‘पर्णमही’ गटातील विद्यार्थिनींनी ‘ग्रामीण जागृती कार्यानुभव’ (RAWE) अंतर्गत अभिनव उपक्रम राबविला.
या कार्यक्रमात गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या गुरुंबद्दल भावना व्यक्त करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिनेश चिपटे आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गाव नकाशा रेखाटन स्पर्धेने झाली. यासाठी विद्यार्थ्यांचे लहान आणि मोठे असे दोन गट तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे गावाचा नकाशा रेखाटून स्पर्धेत सहभाग घेतला. लहान गटात मुग्धा फिलसे, गार्गी तेलप आणि मैत्री पांदे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
मोठ्या गटात अनघा खळे, साई फिलसे आणि श्रावणी फिलसे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.

यासोबतच शाळेत सीड बॉल्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सीड बॉल्स म्हणजे माती, सेंद्रिय खत आणि बियांचे मिश्रण करून बनवलेल्या छोट्या गोळ्या, ज्या थेट जमिनीवर फेकून लावता येतात.
या गोळ्या जंगल, डोंगराळ भाग, मोकळी मैदाने किंवा शेताच्या कडेला टाकल्या जातात.
विद्यार्थ्यांनी सीड बॉल्सचे महत्त्व जाणून घेऊन स्वतः गोळ्या तयार केल्या आणि नियुक्त ठिकाणी फेकून वनीकरणाच्या प्रयत्नांत योगदान दिले.

नकाशा रेखाटन स्पर्धा आणि सीड बॉल्स कार्यशाळा या दोन्ही उपक्रमांनी जैवविविधता आणि स्थानिक भूगोलाविषयी जागरूकता वाढवली.
पर्यावरण व्यवस्थापन आणि सामुदायिक विकासाला प्रोत्साहन देणारी पिढी घडवण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरले.